मुंबई - प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोध मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी १४ हजार ८८९ व्यक्तींचा शोध घेतला आहे. त्यापैकी २ हजार २३४ व्यक्तींना कोरोना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची शोध मोहीम जोरात सुरु करण्यात आली आहे. कोरोना चाचण्या वाढवल्याने आणि संशयितांची शोध मोहीम तीव्र केल्याने कोरोना बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या अधिक आढळून येत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अन्य व्यक्तिंना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून अशा संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. मुंबईच्या विविध भागातून गुरुवारी अशा १४ हजार ८८९ व्यक्तींचा पालिकेने शोध घेतला आहे. त्यापैकी २ हजार २३४ व्यक्तींचा शोध घेत कोरोना काळजी केंद्र-१ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने २४ विभागांमध्ये आरोग्य स्वंयसेविका आणि स्थानिक स्वयंसेवक घरोघरी आणि झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मुंबईच्या २४ विभागातील सर्वेक्षणासाठी टीम तयार केली आहे. ही टीम घरांचे सर्वेक्षण करत आहे. ही सर्वेक्षण मोहीम एखाद्या विभागात एकदा राबवली गेली असली तरी पुन्हा त्याच भागात जाऊन पुन्हा सर्वेक्षण करते.
आतापर्यंत ८ लाख ३४ हजार ३४४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करत संशयीतांचे स्वॅब घेणे, अँटिजेन टेस्ट यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.