मुंबई : बॉम्बस्फोट होऊन विमान कोसळत असल्याचे चित्र ट्विटद्वारे पाठवून एकच खळबळ उडवून देणार्या एका १८ वर्षांच्या बारावीच्या विद्यार्थ्यांला विमानतळ पोलिसांनी सुरत येथून अटक केली. लक्ष्य संजय जैन असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खोटी माहिती देऊन धमकी दिल्याचा आरोप आहे.
विमान कोसळत असल्याचे चित्र - थट्टामस्करीत केलेले ट्विट या मुलाच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या वृत्ताला एसीपी श्रीराम कोरेगावकर यांनी दुजोरा दिला असला तरी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. विलेपार्ले येथील एअरपोर्टवर दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने एक ट्विटद्वारे बॉम्बस्फोट होऊन विमान कोसळत असल्याचे चित्र पाठविले होते. या व्यक्तीला विमानात बॉम्बस्फोट होऊन विमान कोसळणार आहे असे सूचित करायचे होते.
बोगस ट्विट असल्याचे उघडकीस - या ट्विटनंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली होती. त्यामुळे उड्डाण करण्यापूर्वीच प्रत्येक विमानाची सुरक्षा अधिकार्यांकडून कसून तपासणी केली जात होती. मात्र कुठल्याही विमानात या अधिकार्यांना काहीही आक्षेपार्ह सापडले नव्हते. हे बोगस ट्विट असल्याचे उघडकीस येताच विमानतळावरील एका अधिकार्याच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ५०५ (१), ५०६ (ब) भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
मोबाईल पोलिसांनी जप्त केला - या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. तपासादरम्यान ते ट्विट सुरत शहरातून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर एक पथक सुरतला पाठविण्यात आले होते. या पथकाने रात्री उशिरा तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ते ट्विट त्याच्या मोबाईलवरुन अपलोड केल्याचे उघडकीस आले. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
थट्टामस्करीत हे ट्विट केले - हा मुलगा सध्या बारावीत शिकत असून शुक्रवारी ३१ मार्चपासून त्याची बारावीची बोर्डाची परिक्षा सुरु झाली. लक्ष्यचे वय अठरा वर्ष वीस दिवस असून वीस दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला होता. त्याचे वडिल व्यापारी असून त्यांचा स्वतःचा सुरत शहरात व्यवसाय असल्याचे बोलले जाते. आतापर्यंतच्या चौकशीत त्याने थट्टामस्करीत हे ट्विट केले होते. मात्र बॉम्बस्फोट होऊन विमान कोसळत असल्याचे चित्र ट्विट करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची अंधेरीतील कोर्टाने दुसर्या दिवशी जामिनावर सुटका केली.