मुंबई : दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र यंदा पावसाने दडी मारली आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना दुसरीकडे वाढलेल्या उकाड्यामुळे जनताही त्रस्त झाली आहे. यंदा मार्च ते जून या कालावधीत उन्हाचा कडाका जोरदार असल्याने आतापर्यंत राज्यात सुमारे 12 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, 2650 नागरिक उष्माघाताने बाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आढळले आहे. त्या पाठोपाठ कोकणातील रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. मात्र दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गसह अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची शून्य नोंद झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
यंदा उष्णतेच्या अती तीव्र लाटा : दरवर्षी मार्च ते जून या महिन्यादरम्यान उष्णतेच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. मात्र यंदा उष्णतेच्या झळा अधिक प्रमाणात राज्यातील जनतेला सोसाव्या लागल्या आहेत. विदर्भ मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या विभागातील काही जिल्हे उष्णतेच्या लाटांनी दरवर्षी प्रभावित होतात. दरवर्षी उष्णतेच्या लाटांमुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची नोंद नगरपालिका महानगरपालिका आणि आरोग्य विभागाकडून ठेवण्यात येते. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा कमी होऊन पावसाळा सुरू होतो. मात्र यंदा अद्यापही पाऊस न पडल्याने उष्माघाताच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोणाला काय जाणवतो त्रास? : उष्णतेचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना स्नायूंमध्ये गोळे येणे, शरीराचे निर्जलीकरण होणे, चक्कर येणे, यासह तीव्र उष्माघाताचा त्रास होतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे यंदा नागरिकांना उष्माघाताचा अधिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी मार्च ते जून 20 पर्यंत राज्यातील सुमारे 2650 नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र यावर्षी सर्वाधिक उष्माघाताचा त्रास रायगड जिल्ह्यात झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान नागरिकांना सहन करावा लागला. यामध्ये 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. एक वर्षाखालील आणि एक ते पाच वर्ष वयोगटातील मुलांनाही उष्माघाताचा त्रास जाणवतो. त्यासोबत गरोदर माता आणि मधुमेह हृदय विकार तसेच अल्कोहोलिक व्यक्तीलाही हा त्रास जाणवतो. शेतामध्ये अथवा उन्हामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनाही उष्माघाताला बळी पडावे लागते.
उष्माघाताचे किती रुग्ण? : रायगड जिल्ह्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर बारा जणांचा मृत्यू आणि 412 रुग्णांची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात 334 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नागपूरात 317 रुग्णांची नोंद, चंद्रपूरात 177 रुग्णांची नोंद, रत्नागिरीत नऊ रुग्णांची नोंद, भंडारात सात रुग्णांची नोंद, परभणीत चार रुग्णांची नोंद, वाशिम जिल्ह्यात चार रुग्णांची नोंद, पालघर जिल्ह्यात तीन रुग्णांची नोंद, गोंदिया हिंगोली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद, तर धुळे अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा -