ठाणे : अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी हल्ला झाला होता.दरम्यान कल्पिता पिंपळे आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांची या हल्ल्यात हाताची दोन बोटे निकामी झाली. त्यांच्यावर तब्बल ३ महिने त्याचावर उपचार सुरू होते.
उपचारानंतर डिसेंबर महिन्यात महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांनी पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात केली. माजीवडा - मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामानांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे तब्बल ४ महिन्यानंतर अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाला कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोलशेत येथील मीरा आई परिसरात भूमाफियांनी कांदळवन तोडून खाडी बुजवून अनधिकृत चाळी उभारल्याची माहिती पिंपळे यांना मिळाळल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अतिक्रमण पथकाला बोलावून भूमाफियांनी उभारलेल्या चाळी उध्वस्त केल्या आहेत. भविष्यात तीव्र कारवाई पाहायला मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे हे देखील त्याच्यासोबत कर्तव्य पार पाडत होते.