मुंबई : राज्यात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण वाढत असताना कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात 25 मार्च रोजी 437 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 तर औरंगाबाद येथे 1 अशा 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1956 सक्रिय रुग्ण आहेत. अजून देखील कोरोनाची भिती कमी झालेली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका निम्म्यावर कमी होत असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.
मुंबईत 20 रुग्ण ऑक्सिजनवर : मुंबईत आज 105 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 478 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 56 हजार 261 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 36 हजार 27 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या 4350 पैकी 32 खाटांवर रुग्ण आहेत. 20 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची आरोग्य विभागाने दिली. कोरोनाबरोबरच आता नव्याने आलेल्या ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने थैमान घातले आहे.
'या' जिल्ह्यात सक्रिय रुग्ण : राज्यात एकूण 1956 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पुणे येथे 571, मुंबईत 437, ठाणे येथे 348, नाशिक 68, सोलापूर येथे 63, रायगड 61, औरंगाबाद 57, अहमदनगर 50 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 41 हजार 457 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 79 लाख 91 हजार 66 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेतील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मागील आठवड्यात ठाण्यात एका रूग्णाचा इन्फ्ल्युएंझा या आजाराने मृत्यू झाला आहे.