मुंबई - कोरोनाच्या काळात लढणाऱ्या तब्बल १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये १०६ पोलीस अधिकारी असून ९०१ पोलीस कर्मचारी आहेत. अद्यापही ८८७ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेकजण लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना दिसत नाही. लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर अद्यापही ८८७ पोलिसांवर उपचार सुरू असून यामध्ये ९१ पोलीस अधिकारी आणि ७९६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३ हजार ३४५ गुन्हे नोंदविण्यात आले असून 662 जणांवर क्वारंटाईनचे नियम मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 207 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 747 जणांना अटक केली आहे. कोविड 19 च्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 88 हजार 623 फोन आले. तसेच अवैध वाहतुकीच्या 1 हजार 291 प्रकरणात 55 हजार 784 वाहन जप्त करण्यात आले आहेत. कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफ वर 33 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 82 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.