मुंबई : चालत्या लोकल ट्रेनवर दगड फेकणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली आहे. राकेश धरमसिंग रोड असे (वय ३९) असे या आरोपीचे नाव आहे. राकेशने ८ मे २०२३ रोजी मध्य रेल्वेवरील धावत्या लोकल रेल्वेवर दगडफेक केली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली होती. वडाळा रोड आणि कुर्ला या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. सत्र न्यायालयात त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला होता. न्यायालयाने आज त्याला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
रेल्वे दगडफेक करणाऱ्याला शिक्षा : न्यायमूर्ती अभय जवळेकर यांनी हा आज निकाल जाहीर केला. रेल्वेमध्ये आपण प्रवास करत असताना कोणीतरी दगडफेक करतो, त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्याच्या डोक्याला, डोळ्याला किंवा मेंदूला दुखापत होते. यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. पण आरोपी मात्र मोकाट असतो. त्याला शिक्षा होत नाही. मुंबईच्या सत्र न्यायालयाने आज अशाच एका आरोपीला दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
१० साक्षीदाराच्या साक्षीने सुनावली शिक्षा: पोलिसांनी केलेल्या उचित तपासाच्या आधारेच आरोपीला शिक्षा देता आली आहे. राकेश धरमसिंग रोड हा 2018 पासून विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याने वडाळा रोड या ठिकाणी लोकल ट्रेनमध्ये दगड फेकला होता. तसेच कुर्ला या ठिकाणीदेखील धावत्या रेल्वेवर दगड फेकला होता. यामध्ये काही लोकांना मारदेखील लागला होता. यासंदर्भात पोलिसांनी कसून तपासणी केली आणि दहा साक्षीदारांच्या साक्षीने अखेर हा खटला न्यायालयामध्ये उभा राहिला. न्यायालयाच्या समोर साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे आज सत्र न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.
सत्र न्यायालयाने आरोपीला दिला वकील: वडाळा रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याचा हा खटला सत्र न्यायालयामध्ये चालवण्यात आला.परंतु त्याच्या बाजूने कोणीही वकील नव्हता. म्हणून सत्र न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि त्याच्या बाजूने एक वकील बाजू लढवण्यासाठी दिला गेला. त्या वकिलाचे नाव गोषवाल अविनाश गिरी आहे. तर अभिजीत गोंडवाळ हे सरकारी पक्षाचे वकील होते. न्यायालयाने एमेकस क्युरी या अंतर्गत हा वकील आरोपीला देण्यात आला होता. कुर्ल्यामधील पोलीस स्टेशनमध्ये राकेश धरमसिंग रोड याच्यावर अनेकदा याचप्रकारे गुन्हा केल्याची नोंद आहे. वडाळा येथेही रोडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात साक्ष आणि उपलब्ध पुराव्यानुसार न्यायमूर्ती अभय जवळेकर यांनी अखेर त्याला दहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.