मुंबई Turnover In Ayodhya : देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचंही २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे. (UP Economy On 22 January) या सोहळ्यासाठी देश-विदेशातील रामभक्त २२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, अयोध्येत दाखल होणार आहेत. यानिमित्त देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे. तसंच देशातील विविध भागात, राज्यात, शहरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. (Ayodhya Turnover On 22 January) दरम्यान, याच सोहळ्यामुळं २२ जानेवारी रोजी अर्थकारणाची मोठी चक्रं फिरणार असून, यातून अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी मोठी उलाढाल होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही फेका-फेकी असल्याचं तज्ञांनी म्हटलंय.
उलाढाल कशा प्रकारे होणार? - २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेश आणि अयोध्यामध्ये तब्बल १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार आहे, अशी माहिती ट्रेडर्स संघटनेनी दिली आहे. श्रीराम मंदिर आणि प्रभू राम यांच्याची संबंधित कित्येक वस्तू बाजारात आल्या आहेत. प्रभू श्रीराम असलेले पुतळे, झेंडे, शर्ट, कुर्ता, फोटो फ्रेम, बॅनर, टोप्या, अंगठ्या, अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती असलेली लहान-लहान मंदिरं आदींच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, यांची प्रचंड विक्री होत आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि अयोध्यामध्ये देश-विदेशातील रामभक्त दाखल होत असल्यामुळं टूर ट्रॅव्हल्स, हॉटेल आणि लॉज यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी २२ जानेवारी रोजी अयोध्यात १ ट्रिलियन रुपयांची अर्थात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती ट्रेडर्स संघटनेनी दिली आहे. तसंच प्रभू रामावरील भक्ती आणि श्रद्धा यामुळं कित्येक नागरिकांनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळंसुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये भर पडत असून, २२ जानेवारी रोजी मोठी उलाढाल होणार असल्याचं बोललं जातंय.
हे थोडं धाडसाचं होईल : एकीकडे भारताची आगामी काळात ५ ट्रिलियन एवढी अर्थव्यवस्था करण्याचं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं असताना, दुसरीकडे एका दिवसात एका राज्यात नाही तर एका शहरात १ ट्रिलियनची उलाढाल होईल यात शंका आहे. तसंच एकाच दिवसात १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होईल असं म्हणणं थोडं धाडसाचंच होईल, असं शेअर मार्केट तज्ञ निखिलेश सोमण यांनी म्हटलं आहे. कारण १ ट्रिलियन हा आकडा खूप मोठा आहे. याच्या जवळपास जाणेही कठीण आहे. म्हणून केवळ एकाच दिवसात एवढी मोठी उलाढाल होईल, असं मला वाटत नाही असंही ते म्हणाले.
लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न - काँग्रेस : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे. राम हा सगळ्यांचाच आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भाजपाने याचा पॉलिटिकल अजेंडा बनवला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्त्या हेमालता पाटील यांनी केली आहे. तसंच फक्त एका दिवशी १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल हे शक्यच नाहीतर अशक्यप्राय गोष्ट आहे. हे आकडे फेकले जाताहेत. सरकार सर्वच बाबतीत खोटं बोलत आहे. जीडीपी, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी यांचीही आकडेवारी सरकारकडून चुकीची आणि खोटी सांगितली जाते. अयोध्यात १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार हे धादांत खोटं आहे, असं काँग्रेस प्रवक्त्या हेमालता पाटील यांनी सांगितलं.
एवढी महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था नाही-अर्थतज्ज्ञ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अनेकवेळा जाहिरातीतून म्हणत असतात की, यूपीची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. मग जर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन अजून नाहीतर, एका दिवसात १ ट्रिलियन उलाढाल कशी काय शक्य आहे? असा सवाल अर्थतज्ञ आणि बँकिंगतज्ञ विश्वास उटगी यांनी उपस्थित केला आहे. १ ट्रिलियनची उलाढाल ही आकडेवारी फेकाफेकीची आहे. यातून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोपही विश्वास उटगी यांनी केला आहे.
हेही वाचा: