मुंबई - राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रूग्णांना बेड मिळत नसल्याने रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त आहेत. रूग्णांना सुविधा देता याव्यात म्हणून महानगरपालिका बेड उपलब्ध करून देत आहे. वरळीत १ हजार १७५ बेड उपलब्ध करून देण्यात आले. राज्याचे पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने त्याचे लोकार्पण करण्यात आले.
वरळीत बेड वाढणार -
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला होता. मात्र, यावर्षी फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रूग्णांना बेड मिळावेत म्हणून खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतले जात आहेत. तसेच कोविड सेंटरचीही क्षमता वाढवली जात आहे. वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया म्हणजेच एनएससीआय येथील विद्यमान कोरोना आरोग्य केंद्रातील बेडची क्षमता ५०० वरून वाढवून ती ८०० इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वरळीतील बेडची संख्या वाढणार आहे.
७० टक्के ऑक्सिजन बेड -
नेहरू विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय व एनएससीआय मिळून एकूण १ हजार १७५ नविन बेड उपलब्ध झाल्याने कोविड बाधितांवरील उपचारांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व बेडमधील एकूण ७० टक्के बेड ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नेहरू विज्ञान केंद्रातील कोविड रूग्णालय उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला नयन समुहाच्या सीएसआर फंडातून सहकार्य मिळाले आहे.
हेही वाचा - नाशिक: कोरोनाने लक्षण बदलल्याने वाढला रेमडेसीवीरचा वापर