लातूर - दिवसेंदिवस लातूरकरांच्या पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जिल्ह्यात 500 हुन अधिक जलस्त्रोतांचे अधिग्रहण असताना शहरातील 5 विहिरींचेही अधिग्रहण करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर शहरातील 5 विहिरींचे अधिग्रहण केल्याने आता गणेश विसर्जनावर काय पर्याय काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऐन पावसाळ्यात लातूरकरांवरील पाणीटंचाईचे सावट कायम आहे. शहराला सध्या 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात असून आगामी काळातील संकट टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 5.32 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसागणिक पाणीटंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे.
हेही वाचा -लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख
शहरातील त्या - त्या भागात पाणीपुरवठा व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गोरक्षण संस्था येथील विहीर तसेच सिंचन भवन, सिद्धेश्वर मंदिर, शासकीय कॉलनी आणि आर्वी येथील तिवारी यांच्या विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या विहिरींमधील पाणी स्वच्छ आहे की नाही याच्या तपासणीसाठीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तर या अधिग्रहण केलेल्या विहिरींमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये असेही यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गणेश मूर्ती विसर्जनचा फैसला उद्या -
यंदा पाणीटंचाईमुळे गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये तर या मूर्तींचे दान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीतच केले होते. गेल्या 8 दिवसांमध्ये पाऊसही न झाल्याने आता काय निर्णय घेण्यात येईल हे उद्या मंगळवारी ठरणार आहे. तर, शहरातील मानाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक उद्या होणार असून त्यामध्ये गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने निर्णय होणार आहे.
हेही वाचा - लातुरात संभाजी सेनेचा जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा