लातूर - कोरोना संसर्गामुळे संचारबंदी सुरू असल्याने अवैध वाहतूक बंद आहे. मात्र एका गाडीतून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने ती गाडी अडवायला तरुण धाऊन गेला अन् जीव गमावून बसल्याची घटना देवणी तालुक्यात घडली. सुदर्शन गोविंद शारवाले (वय २३) असे त्या जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना जवळगा (सा.) येथे घडली.
देवणी तालुक्यातील जवळगा सा. येथील सुदर्शनला वलांडी पोलीस चौकीवरून शनिवारी रात्री साडेदहा वाजता फोन आला होता. यावेळी त्याला वलांडीहून लातूरकडे गुटखा भरून एक गाडी जात असल्याची माहिती देण्यात आली. ती गाडी तू आडव आम्ही पाठीमागून येत आहोत, असा निरोप त्याला देण्यात आला. त्यामुळे सुदर्शन गाडी अडवण्यासाठी रोडवर गेला आणि आपला जीव गमावून बसला.
अचानक काय झाले कोणास काहीच कळले नाही. गाडीत बसलेल्याने त्याला मारल्याचा कुटुंबीयांना संशय आहे. त्याच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला मारल्याची खूण आहे. गुटखा भरलेली गाडी म्हणून त्याने दुसरीच गाडी आडवली. ही गाडी (एम एच १४, एचजी ७५३५) नंबर असलेला छोटा हत्ती हा मुशीराबाद येथील असून ती पिंपरी चिंचवड येथील एकाच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीमधील तिघेजण सध्या देवणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गाडी का आडवली याचा राग आल्याने गाडीतीलच एका व्यक्तीने लोखंडी राडने माझ्या भावाला मारल्याचा आरोप त्याचा सुदर्शनच्या नातेवाईकांनी केला आहे. वलांडी पोलीस चौकीतील पोलीस मात्र यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. सदरील तरुणाचे वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.