लातूर - जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामागे असलेल्या पाण्याच्या हौदात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ७ ते ८ दिवसांपासून हा मृतदेह तेथे असल्याची शक्यता असून तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहे. शिवाय शावविच्छेदन करण्यातही अडचणी येत असल्याने उद्या हा हौद फोडून शवविच्छेदन केले जाणार असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याने सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाच्या मागच्या बाजूस पाण्याचा हौद आहे. शनिवारी सकाळी सफाई कामगार या परिसरात स्वच्छता करीत असताना त्यांना दुर्गंधी आली. यानंतर त्यांनी पाण्याच्या हौदात पाहीले असता त्यांना तरुणाचा मृतदेह दिसला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय शवविच्छेदन करणेही अवघड होत असल्याने उद्या हौद फोडूनच प्रक्रिया केली जाणार आहे. घटनास्थळी अग्निशमनचा बंब दाखल झाला असून गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या अतिशय शांत असलेल्या भागात ही घटना घडली असून घात-पात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.