लातूर - एका व्यवसायिकाच्या गोडाऊनमध्ये कामाला असलेल्या कामगारांनी फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन यासारख्या उपकरणांची परस्परच विक्री केली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील आझाद चौक येथे संजय मोर मुकुट ब्रिजवासी यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान असून गोडाऊन एमआयडीसी भागात आहे. या गोडाऊनमधून 4 महिन्यांच्या कालावधीत कामावर असलेल्या बसवराज कामशेट्टी, तेजस गांजकर, अजितसिंग ठाकूर यांनी वेगवेगळ्या कंपनीचे 79 फ्रीज, 19 वॉशिंग मशीन, 45 एअर कूलर, 3 मायक्रो ओहेन, 4 एलईडी टीव्ही विकून एकूण 13 लाख 41 हजार लंपास केले. याप्रकरणी संजय मोर मुकूट ब्रिजवासी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. गोपनीय सूत्रांकडून व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता या तिघांनीच चोरी केली असल्याचे समोर आले आहे.
या सर्व उपकरणांची त्यांनी परस्पर विक्री करून लाखो रुपये कमावले होते. गुन्ह्याची उकल होताच यापैकी 11 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून विक्री केलेल्या वेगवेगळ्या लोकांकडून हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित मालही लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई 24 तासांमध्ये केली आहे.