लातूर - उदगीर येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली. आज (शनिवार) महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. अहवाल आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे उदगीरमध्ये खळबळ उडाली आहे.
लातूरमध्ये यापूर्वी 8 परप्रांतीय हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. 14 दिवसांच्या उपचारानंतर या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते. त्यामुळे लातूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, शनिवारी उदगीर येथील एक 70 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आणि अवघ्या काही तासांमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सदरील महिला आजारी असल्याने सामान्य रुग्णालयात अॅडमिट होती. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आणि आजच तिचा मृत्यू झाला.
ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती. तिला कोरोनाची लागण नेमकी कधी झाली. यासारखे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली होत आहे काय? असा सवालही निर्माण होऊ लागला आहे.