लातूर - घरातील सततच्या भांडणास कंटाळून पत्नीनेच पतीच्या डोक्यात सिमेंट चिटकलेल्या विटाने मारून हत्या केल्याची घटना निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगद येथे घडली. याप्रकरणी मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पत्नीस कासार सिरसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
![crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ltr02-02may-patninepatishihatya-7204537_02052019183835_0205f_1556802515_310.jpg)
कुटुंबातील सततच्या वादाचे रूपांतर हत्येत झाल्याच्या अनेक घटना घडतात. या घटनेत मात्र, पत्नीनेच पतीची ठेचून हत्या केल्याने एकोजी मुदगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कासार सिरसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देविदास श्रावण वाघमारे (वय ४८) वर्ष (रा. उदर जि. रायगड ह. मू. एकोजी मुडगड) हा घरात पत्नीशी सतत भांडण करीत होता. सततच्या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी सुनीता देविदास वाघमारे (वय ४२) वर्ष हिने मंगळवारी रात्री गावाच्या शेजारी असलेल्या मोबाइल टॉवरजवळील लिंबाच्या झाडाखाली त्यास नेहून प्रथम लाथाबुक्याने मारहाण केली. यानंतरही भांडण होत असल्याने तिने थेट सिमेंट चिटकलेल्या वीटाने तोंडावर व डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. यात देविदास श्रावण वाघमारे याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताची मुलगी मीना देविदास वाघमारे हिने दिलेल्या फिर्यादीवरून या घटनेची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी सुनीता वाघमारे हिला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास येथील सहायक पोलीस निरीक्षक मोतीराम निकम हे करीत आहेत.