लातूर - पाणीटंचाई आणि लातूर हे असेच काहीसे समीकरण बनले आहे. भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. तर आता दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. अशा अवस्थेतच महानगरपालिकेकडे महावितरणची कोट्यवधीची थकबाकी असल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी गेल्या पंधरा दिवसांपासून मांजरा धरणावरुन होणारा पाणी पुरवठा खंडीत असून लातूरकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
हेही वाचा- जम्मू-काश्मीरात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात का होईना लातूरकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागला होता. धरणात साठलेल्या पाण्याचे नियोजन करत लातूरकरांना सध्या दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, एकीकडे पाण्याचे नियोजन करत असताना कुठेतरी आर्थिक बाजूचे नियोजन करण्यास महानगरपालिका कमी पडली आहे. कारण नागजरी, साई आणि वरवंटी येथील जल शुद्धीकरण केंद्रावरील वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी विकतच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
सहा महिन्यांपासून मनपाकडे महावितरणची 1 कोटी 25 लाखांची थकबाकी आहे. आता पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान एक महिन्याचा तरी बिल अदा करावा लागणार आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असून सध्या केवळ पंचवीस लाख रुपये शिल्लक असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे 80 लाखांचे बिल कसे अदा केले जाणार हे देखील पाहावे लागणार आहे.