लातूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांसाठी आरक्षीत पाण्याची मागणी होत होती. मागणी लक्षात घेऊन निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून सोमवारी ३ एमएमक्यूब पाणी लातूरमध्ये सोडण्यात आले. मंगळवारी सकाळीच दोन्ही कालव्यात पाणी आल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. या पाण्याचा ४० गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
दोन्ही कालव्यात पाणी आल्याने शेतकरी आनंदीत झाले. त्यांनी पिकांना पाणी देण्याची धावपळ सूरू केली. या पाण्यामुळे एक हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे. तसेच दोन वेळा शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा... खाते वाटपासाठी महाआघाडीत खलबते, तिन्ही पक्ष नेत्यांची बैठक
हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने औसा तालुक्यातील बहुतांश भागात पेरण्या झाल्या नव्हत्या. मात्र परतीचा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. याच हंगामावर सर्वस्वी मदार असल्याने निम्न तेरणा प्रकल्पातील शेतीसाठी आरक्षीत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एस.एन.चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी सोडण्याची परवानगी मिळवली.
हेही वाचा... अल्पबचत योजना : जानेवारी-मार्च तिमाहीत व्याज दर 'जैसे थे'
रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडी पिकांना हे पाणी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. माकणी धरणातून सोडलेल्या पाण्याचा सर्वाधिक उपयोग औसा व निलंगा तालुक्यातील ४० गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी या आरक्षीत पाण्यासाठी आग्रही होते. सात ते आठ दिवस पाणी सोडले जाणार आहे. निम्न तेरणा प्रकल्पातील कालव्यात सात दिवस पाणी राहणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहेत.