लातूर - गेल्या वर्षभरात मृतसाठ्यात असलेलेले मांजरा धरण अखेर गुरुवारी रात्री मृतसाठ्याबाहेर आले आहे. त्यामुळे बीड जिल्हा हद्दीत असलेल्या या धरणामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. मांजरा धरणातून लातूरकरांना पाणीपुरवठा केला जातो.
लातूर शहरातील नागरिकांना आणि येथील एमआयडीसीला मांजरा धारणावरून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे मांजरा धरण मृतसाठ्यात होते. या धरणाची क्षमता 635.66 दलघमी आहे. मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी 47.5 दलघमीची पाणीपातळी ओलांडणे गरजेचे होते. लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी बीड आणि कळंब परिसरात झालेल्या पावसामुळे 48.192 दलघमी पाणीसाठा या धरणात झाला आहे. त्यामुळे 1.062 दलघमी एवढा उपयुक्त साठा धरणात झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी ही 16 दलघमीवर आली होती.
![water level of manjara dam increased](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ltr-01-manjra-dam-update-vis-photo-7204537_21082020084712_2108f_1597979832_768.jpg)
![water level of manjara dam increased](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ltr-01-manjra-dam-update-vis-photo-7204537_21082020084712_2108f_1597979832_890.jpg)
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे लातूर शहराला किमान 12 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. आता पाणीपातळी वाढल्याने आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यातच बुधवारी रात्री हे धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे. त्यामुळे लातूरसह, अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या घटनेमुळे लातूरकरांचा किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.