लातूर - यंदा हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. याचाच परिणाम म्हणून मांजरा धरणात 5 दलघमीने ('दलघमी' म्हणजे दहालाख घनमीटर) पाणीसाठा वाढला आहे. लातूर शहराची तहान याच धरणावर असल्याने पाणीसाठ्यात होत असलेली वाढ लातूरकरांना दिलासा देणारी आहे.
मांजरा धरण उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीत असले तरी याच धारणावरून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर केल्याने लातूरकरांची तहान भागली होती. 12 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर ओढावली होती. असे असतानाही मांजरा धरणात 19 दलघमी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, समाधानकारक पावसामुळे 5 दलघमी पाणीसाठा वाढला असून सद्यस्थितीत 23.99 दलघमी पाणीसाठा झाला आहे.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने दिवसाकाठी साठ्यात वाढ होत आहे. मात्र, सध्या तरी शहराला 10 दिवसातून पाणी मिळत असले तरी अशीच वाढ होत राहिल्यास यामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो. दरवर्षी, मांजरा धरणाच्या पाणीपातळी विषयी चिंता व्यक्त केली जाते. यंदा मात्र, पावसाने वेळीच दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. लातूर शहरासह धारूर, अंबाजोगाई, केज, कळंब येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.