लातूर - बसविना प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करत संबंधित नागरिक आपले गाव गाठतात. मात्र गावाकडे जाण्यासाठी बसच नसल्यामुळे गावातील काही अज्ञात तरुणांनी थेट बसवर ताबा मिळवत गाव जवळ करण्याचा प्रयत्न केला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी बसस्थानकात हा अनोखा प्रकार घडला आहे
स्थानकातून पळवली एसटी-
बुधवारी रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी एसटी नव्हती. स्थानकात थांबलेल्या आणि दारूच्या नशेत असलेल्या शेळगी गावातील काही तरुणांनी थेट एसटीच पळवून नेण्याचा बेत आखला. औराद बसस्थानकातील एक एसटी त्यांनी पळवली देखील. एसटी स्थानकातून बाहेर काढताना मात्र, ही बस आगाराजवळच्या दोन लाईटच्या खांबांना देखील धडकली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या शिवाय विजेचा खांब देखील कोसळला.
बेपत्ता झालेली एसटी शेळगी गावात-
पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बस चालक आणि वाहकाला त्यांची एसटी जाग्यावर नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. तक्रारीनंतर औराद पोलिसांनी एसटीचा शोध घेतल्यानंतर बेपत्ता झालेली एसटी शेळगी गावात सापडली. यात एसटीचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद नाही.
एसटी खात्याचा गलथानपणा या निमित्तानं चव्हाट्यावर आला असून नेमकं एसटी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्याना पोलीस प्रशासन व एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे .