लातूर : चार दिवसाच्या उघडीपनंतर आज (गुरुवार) जिल्ह्यातील काही भागात वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दक्षिण-शेंद येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. अभिजित राजकुमार मोरे (वय 18) आणि गौतम दिगंबर कांबळे (वय 34)अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
दक्षिण-शेंद येथे शेतामध्ये अभिजित मोरे आणि गौतम कांबळे हे दोघे काम करत होते. दरम्यान, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे काम करणाऱ्या लोकांनी आंब्याच्या झाडाखाली आसरा घेतला. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने इतरांनी गोठा गाठला. मात्र, हे दोघे झाडाखालीच उभे राहिले. परंतु, दुपारी 4 च्या सुमारास अचानक झाडावर वीज कोसळली. यावेळी अभिजित आणि गौतम हे दोघेही झाडाखालीच होते. या घटनेनंतर दोघांनाही वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी, येरोळ मंडळाचे तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून देवणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.