निलंगा (लातूर) - मध्य प्रदेशमधून हैदराबादकडे गहू घेऊन निघालेल्या ट्रकचालकाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी करण्यात आलेल्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी आडवले आणि त्या ट्रकचालकाला पाचशे रुपयांची मागणी केली. त्या ट्रकचालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्या ट्रकचालकाला जबर मारहाण केली. या मारहाणीत ट्रकचालकाचा हात फॅक्चर झाला आहे.
औसा तालुक्यातील जवळगा गावाचे राहणारे लक्ष्मण गोविंद गोसावी हे ट्रकचालक आहेत. ते आपल्या ट्रकमध्ये (ए. पी. ३९ टी. बी. ४०१९) बुधवारी (ता. २०) मध्य प्रदेशमधून गहू घेऊन हैदराबादकडे निघाले होते. तेव्हा त्यांना कोरोनामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नाकाबंदी करण्यात आलेल्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी अडवले आणि लक्ष्मण यांना कागदपत्राची मागणी केली.
कागदपत्र दाखवल्यानंतर पोलिसांनी लक्ष्मणला ५०० रुपयांची मागणी केली. तेव्हा लक्ष्मण यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी लक्ष्मण यांना जबर मारहाण केली. महत्त्वाची बाब म्हणजे कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन आणि महाराष्ट्राच्या पोलिसांची काठी घेऊन लक्ष्मण यांना मारहाण केली. या मारहाणीत लक्ष्मण याचा हात फॅक्चर झाला आहे. विनाकारण काही चूक नसताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
हेही वाचा - कचरागाडीमध्ये उभे करून महिलेला सोडले घरी, औसा नगर परिषदेचा प्रताप
हेही वाचा - मुलाच्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५१ हजार रुपये...