लातूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची पाऊलवाट मी पाडली, असे वक्तव्य बीडचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. राज्यात महाशिवाघाडीची सत्ता स्थापन होत असली तरी स्थानिक पातळीवरील तेढ मात्र कायम राहणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले आहे. आज पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी लातुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या स्थापनेपासून जयदत्त क्षीरसागर हे पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र, विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला राम-राम करत धनुष्यबाण हाती घेतले.
हेही वाचा - सेनेचे निवडून आलेले आमदार मुंबईतच, माजी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर
पराभव स्वीकारावा लागल्याने पक्ष सोडून चूक केली असे वाटते का, असे विचारले असता ते म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते. निवडणुकीत जय-पराजय हा होतोच. आता शिवसेनेचा शिपाई म्हणून कार्य करत आहे आणि यापुढेही हे कायम राहणार आहे" दरम्यान, पिकांची पाहणी केली असून येथील स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.