लातूर - घर फिरले की, घराचे वासेही फिरतात असाच काहीसा प्रकार युती सरकारच्या बाबतीत होत आहेत. वृक्षलागवडी संदर्भात महाविकास आघाडीकडून चौकशीचे संकेत मिळताच गावपातळीवर याचे परिणाम दिसू लागले आहेत. मोहिमेदरम्यानच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने चक्क पुन्हा या मोहिमेला सुरूवात केल्याचे वास्तव लातूरात समोर आले आहे.
गतवर्षी 7 कोटी वृक्षलगवड करण्याची मोहिम भाजप सरकारने सुरू केली होती. त्यानुसार जुलै महिन्यात उद्दिष्ट्यही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या महत्त्वाच्या मोहिमेत पारदर्शकता नसून लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले. त्यामुळे वनविभाग खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे उदगीर आणि अहमदपूर तालुक्यात मजूर लावून चक्क मार्च महिना असताना वृक्षलागवड केली जात आहे.
हेही वाचा - लातुरात अवैध वाळू उपसा विरोधात संभाजी सेनेची निदर्शने
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जून-जुलै महिन्यात शासनाकडून खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. शासनाने दिलेले 7 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी तर काही तालुके दत्तक घेतले होते. 7 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता मार्च महिन्यात उदगीर व अहमदपूर या तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून 2 मार्चपासून वृक्ष लागवड केली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या चौकशीच्या संकेतानंतरच ही यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. झालेल्या चुका मार्चमध्ये वृक्ष लागवड करून लपवण्याचा प्रयत्न उदगीर व अहमदपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाकडून केला जात आहे.
यासंदर्भात सामाजिक वनाधिकारी गंगावणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, याबद्दल अधिक माहिती घेऊन सांगते असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - चिकन मधून कोरोना.. संभ्रम दूर करण्यासाठी लातुरात 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन