लातूर - कृषी विधेयक कायदा हा संसदेतील सदस्यांच्या विचाराने नाही, तर पाशवी बहुमताच्या जोरावर करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे होणारे नुकसान न पाहता राजकीय स्वार्थ साधण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्यामुळे कायद्यातील त्रुटी काय आहेत, हे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 70 ठिकाणी व्हर्चुअल रॅली काढली जाणार आहे. या माध्यमातून हे विधेयक शेतकऱ्यांसाठी कसे नुकसानीचे आहे हे सांगण्यात येणार असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले आहे.
कृषी विधेयकाला मंजुरी मिळाल्यापासून काँग्रेसकडून याला विरोध होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढण्यात आले आहे. असे असतानाही या विधेयकबाबत कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. या कायद्यामुळे बाजार समितीचे व्यवस्थाच नष्ट होणार आहे. तसेच शेती मालाला हमीभाव मिळणार नाही, कामगार, मजूर, आडते हे बेरोजगार होणार आहेत. या सर्व बाबींचा परिणाम राज्याच्या महसुलवर होणार असून शेती विकासही धोक्यात येणार आहे. शेती कराराने केल्यास त्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. तर, होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ही व्हर्चुअल रॅली काढण्यात येणार असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि सर्व नियमांचे पालन करून या लादलेल्या कायद्याला विरोध केला जाणार आहे. पत्रकार परिषदेला महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, किरण जाधव, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.