लातूर - येथील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर बोटरवटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. सासरच्या मंडळीने छळ करून मुलीची हत्या केल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी हे आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने बोरवटीच्या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला.
हेही वाचा- अनुराग कश्यपने बदलला ट्विटर प्रोफाईल फोटो, अनुभव सिन्हाने डागले टीकास्त्र
बोरावटी येथील नम्रताचा सहा महिन्यांपूर्वी लातुरातील मनोज घोरपडे यांच्याशी विवाह झाला होता. मनोज हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी नम्रता रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला उपचारासाठी लातुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळीने शारीरिक, मानसिक त्रास देऊन तिला मारहाण करून, रेल्वे रुळावर टाकल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. असे असूनही सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नसल्याने बोरावटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला. यात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दुतर्फा वाहनकोंडी झाली होती. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.