लातूर - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयााच्या विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र, पुलवामा येथील दुर्घटनेनंतर या विद्यार्थ्यांनी जयंती निमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून जमा झालेला ६ हजार रुपयांचा निधी थेट सीआरपीफ जवानांच्या खात्यामध्ये वर्ग केला आहे.
अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर देशभर विविध प्रकारे निषेध केला जात आहे. बिडवे अभियांत्रिकी येथील विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध तर केलाच शिवाय जवानांसाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. शिवजयंती म्हटले की तरुणांचा उत्साह, शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन. या सर्व बाबींना यंदा विद्यार्थ्यांनी फटा दिला आहे. केवळ दोन दिवसांमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला असून पहिल्या दिवशी जमा झालेला ६ हजाराचा निधी सीआरपीफच्या खात्यामध्ये वर्गही केला आहे.
यावेळी महाविद्यालय परिसरात शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भव्य बॅनर उभा करण्यात आला होता. हा निधी वर्ग करत असताना बॅनरवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आज जमा झालेली रक्कम ही केवळ एका दिवसाची आहे. अणखीन तीन-चार दिवस आम्ही निधी जमा करू. यामध्ये विद्यार्थी पालक आणि प्राध्यापकांचा समावेश असणार आहे. कमीत कमी ५१ हजार रुपयांचा निधी जवानांनासाठी पाठवणार असल्याचा मानस प्राचार्य नरेंद्र खटोड यांनी व्यक्त केला.