लातूर - शिक्षण क्षेत्रात 'लातूर पॅटर्न'चा मोठा गाजावाजा आहे. गतवर्षी दहावीच्या परीक्षांची सुरुवातच कॉपीने झाली होती. यंदा अवघड समजल्या जाणाऱ्या इंग्रजी पेपरपासून या कॉपीयुक्त परीक्षेला सुरुवात झाली आहे.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील जिल्हा परिषदेतील शाळेत पेपर सुरू होताच शाळा परिसरात तरुणांनी गर्दी करून कॉप्यांचा पुरवठा केला. त्यामुळे कॉपीमुक्तीच्या अभियानाला पहिल्याच दिवशी सुरूंग लागल्याचे दिसून येत आहे.
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील दोन पेपर शांततेत पार पडल्यानंतर आज तिसऱ्या इंग्रजीच्या पेपरला मात्र, परीक्षा केंद्रावर यात्रेचे स्वरूप पाहवयास मिळाले. कॉपीमुक्त परीक्षा या धोरणावर शिक्षण विभागाचे काम सुरू असले तरी ग्रामीण भागात कॉप्यांचा सूळसुळाट पाहवयास मिळत आहे. अंबुलगा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत परिसरातील ६०० विद्यार्थी परीक्षेसाठी येतात. आज इंग्रजीच्या पेपरला सुरुवात होताच कॉपी पुरवण्यासही सुरुवात झाली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणांकडे पोलीस प्रशासनासह केंद्रातील शिक्षकही दुर्लक्ष करीत असल्याचे पाहवयास मिळाले. कॉपी पुरवण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.