लातूर - 'कुटुंबीयांचे आरोग्य चांगले तर सर्वकाही सुरळीत' असे म्हणतात. घरात पतीनेच दुर्धर आजारावर मात केली असली तरी आवश्यक ती काळजी घेणे महत्वाचे असताना वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका रणरागिणीने गेल्या सहा महिन्यात एकही सुट्टी न घेता लातूरकरांची अविरत सेवा केली आहे. आज कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार यांच्याकडे पाहिले जात असले तरी या योद्धांची कहाणी काय आहे, याचा आढावा ईटीव्ही भारतने नवरात्र उत्सवानिमित्त घेतला आहे. ही कहाणी एका कोरोना योद्धाची, लातूरकरांना अभिमान वाटेल आशा रणरागिणी डॉ. सुधा गुरू राजूरकर यांची.
'कोरोना' नाव ऐकलं तरी तरी मनामध्ये धास्ती भरावी, अशी अवस्था एप्रिल-मे च्या दरम्यान होती. कोरोनाचा रुग्ण आढळून आला की कुटुंबीयांकडून तो आरोग्य विभागाच्या स्वाधीन केला जात होता. पॉझिटिव्ह रुग्णांची देखभाल एवढीच जबाबदारी आरोग्य विभागाची नव्हती तर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करावी लागत होती. या दरम्यानच्या, काळात सर्वात महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे ती आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी. यापैकीच डॉ. सुधा राजूरकर ह्या एक आहेत. महानगपालिकेत त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हे त्यांचे कर्तव्य असले तरी महिला असून रात्री-अपरात्री गरज पडेल तेव्हा त्या रुग्णाच्या दारात पोहचल्या आहेत. रोजची नियमित कामे तर सोडाच पण दोन वेळचं जेवणही त्यांना शक्य नव्हते. पतीच्या आहाराची जबाबदारी त्यांच्यावर होती, तर कोरोनाच्या काळात पतीनेच त्यांच्या आहाराची काळजी घेऊन रुग्णसेवेला पाठबळ दिले.
मे महिन्यापासून लातूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. शहरात आढळून आलेला प्रत्येक रुग्ण हा डॉ. राजूरकर यांच्या टीमने ट्रेस केलेला आहे. जशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारीही वाढत होती आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होते. डॉ. सुधा राजूरकर यांचे पती गुरू राजूरकर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे. मात्र, या सहा महिन्यांच्या काळात हे देखील डॉ. सुधा राजूरकर यांना शक्य झाले नाही. सकाळी 6 वाजता सुरू झालेले काम रात्री 12 पर्यंत सुरुच असायचे.
राजूरकर दाम्पत्य हे वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांना या काळातील रुग्ण सेवेचे महत्व माहित असावे. म्हणूनच पती गुरू राजूरकर हे त्यांना केवळ पाठबळच देत नव्हते तर त्यांनीच आता पत्नीची काळजी घेण्यास सुरुवात केली होती. शिवाय मुलाचे दहावीचे वर्ष असतानाही त्या पुरेशा वेळ त्यांना देऊ शकलेल्या नाही. अनेक बाबींत त्यांना तडजोड करावी लागली असली तरी आपल्या हातून झालेल्या आरोग्य सेवेचा त्यांना अभिमान आहे. या भीषण महामारीत आपण देशातील नागरिकांच्या उपयोगी आलो याचा त्यांना आनंद आहे. डॉ. सुधा राजूरकर यांच्यासारख्या अनेक योद्धांच्या अथक परिश्रमामुळे कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. ज्या कोरोना योद्ध्यांनी ज्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून इतरांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.