लातूर - आतापर्यंत विविध विक्रम झाले आहेत पण लावणीत सलग 24 तास नृत्य केल्याचा विक्रम कुठेही नाही. याचाच वेध घेत लातूर येथील सृष्टी जगताप हिने नॉनस्टॉप 24 तास लावणीचे सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून यामधून 'आशिया बुक रेकॉर्ड'मध्ये हिची नोंद होणार आहे.
लातूरची 15 वर्षीय सृष्टी जगताप ही आपल्या कलेला उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहे. लहानपणापासून नृत्याचा छंद जोपासत सृष्टी हिने 71 विविध पुरस्कार पटकाविले आहेत. मात्र, लावणीत कोणतेही रेकॉर्ड नसल्याचे तिच्या निदर्शनास आले आणि सलग 24 तास लावणी सादर करण्याचे तिने ठरिवले आहे. या वेगळ्या उपक्रमातून 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नाव नोंदीण्याचा तिचा निर्धार आहे.
हेही वाचा - येरवडा जेल टुरिझममध्ये गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड पाहता येणार
24 तासांत 700 लावण्यांवर करणार नृत्य
मंगळवारी दुपारी येथील दयानंद सभागृहात आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, बालाजी सुळ यांच्या उपस्थितीत या लावणीला सुरवात झाली आहे. दरम्यान, दर दोन तासांनी सृष्टीला 10 मिनिटांचा ब्रेक राहणार आहे. शिवाय दिल्ली येथून परीक्षकही दाखल झाले आहेत. त्यांनी घालून दिलेल्या नियम अटींमध्ये सृष्टीला नृत्य सादर करावे लागणार आहे. या 24 तासांत तिला जवळपास 700 लावण्यांवर नृत्य सादर करावे लागणार आहे. सृष्टीला या अनोख्या उपक्रमात यश मिळण्यासाठी तिचे कुटुंबीय प्रार्थना करीत आहेत.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून जोपासली कला
सृष्टी जगताप हिला वयाच्या तीन वर्षांपासूनच नृत्याची आवड होती. आई- वडील शिक्षक असल्याने त्यांनीही तिचा छंद जोपासला. वेगवेगळ्या कार्यक्रमात तिचा सहभाग नोंदवून तिचे धाडस वाढविले होते. आता वयाच्या 15 व्या वर्षी तिने हे धाडस केले असून तिला यश मिळते की नाही पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या 'जेल टुरिझम' उपक्रमाला सुरुवात