लातूर- जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाशी दोन हात करत पीक पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच दुसरीकडे अज्ञात व्यक्तींकडून सोयाबीनच्या गंजी पेटवून देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसापूर्वीच औसा तालुक्यातील कनिथोट येथील सोयाबीन पेटवून दिल्यानंतर आता अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील ६ एकरातील गोळा करून ठेवलेली सोयाबीन पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे, तालुक्यातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
खरिपातील पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक बाबीसाठी अथक परिश्रम करावे लागले आहेत. असे असताना आर्थिक फटका तर सहन करावाच लागला आहे परंतु, काही व्यक्तींच्या अशा वृत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घासही हिसकवला जात आहे. किनगाव येथील धनराज गिरी यांनी ६ एकरात सोयाबीनची लागवड केली होती. मशागत, काढणीला मजुरी अशाप्रकारचा खर्च करून त्यांनी सर्व सोयाबीन गोळा करून तुरीच्या शेतामध्ये ठेवले. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी या गंजीला आग लावली आणि यामध्ये केवळ सोयाबीनच नव्हे तर गिरी यांचे कष्ट आणि सर्वकाही मातीमोल झाले.
सहा एकरात २ लाखाचे उत्पन्न होईल असा आशावाद गिरी यांना होता. मात्र, या घटनेमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनासपुरे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली. तलाठी हंसराज जाधव यांनी पंचनामा केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रशासनाकडूनही मदत मिळावी, अशी अपेक्षा धनराज गिरी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- लातूरमध्ये नऊ पोती गांजा जप्त; वाढवना पोलिसांची कारवाई