लातूर- जीवन आणि मृत्यूत फक्त एका श्वासाचे अंतर आहे. हेच अंतर लक्षात येत नसल्याने आत्महत्येसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन जिल्ह्यात गत आठवड्यात दोन दिवसांत सहा जणांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. यामध्ये कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना अधिक आहेत. आत्महत्या म्हणले की शेतकरीच असे चित्र निर्माण होते. मात्र, कौटुंबिक कलहातून मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाणही वाढत आहे.
हेही वाचा- काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..
मुलाला चापट मारली अन् दोघांच्याही आत्महत्या
लातूर तालुक्यातील भातांगळी शिवारात मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असलेले राम नरवटे आणि शालूबाई हे दाम्पत्य तीन वर्षांच्या मुलासह राहत होते. बुधवारी दुपारी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यातून रामने तीन वर्षांच्या मुलाला चापट मारली. चापट का मारली म्हणून नवरा-बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. याचाच राग मनात घेऊन शालूबाई यांनी घरातच गळफास घेतला. हे सर्व आपल्यामुळेच घडले हा विचार मनात येताच रामुनेही शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. यात भांडणाला निमित्त ठरलेला चिमुकला मात्र, पोरका झाला आहे. क्षणार्धाच्या संतापमुळे नरवटे कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.
दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेची विहिरीत उडी
तर गुरुवारी उदगीर तालुक्यातील बोरगाव येथे कौटुंबिक वादातून एका २५ वर्षीय महिलेने दीड वर्षाच्या चिमुकलीला घेऊन विहिरीत उडी घेतली. ज्योती संदीप अंतूर (आई) आणि उत्कर्षा अंतूर (मुलगी) अशी मायलेकींची नावे आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्योती यांचा विवाह संदीप अंतुर यांच्याशी झाला होता. त्यानंतर काही काळातच ज्योती आणि संदीप यांच्यात सातत्याने वाद होत होते. या त्रासूनच ज्योती यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. यामध्ये दीड वर्षाच्या निष्पाप मुलीलाही जीव गमवावा लागला आहे.
शिक्षकांची आत्महत्या
तर तिसऱ्या घटनेत लातूर तालुक्यातील मुरुड येथे संजय अच्युतराव गाडे या शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पेशाने शिक्षक असूनही त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, खासगी शाळेत शिकवणारे गाडे यांनी शाळा सुटल्यानंतर घरी येऊन औषध प्राशन करून विहिरीत उडी घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तर, लातूरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकवत असलेले रामदास भगवान केंद्रे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. २००३ पासून ते खासगी विद्यालयात अध्यापनाचे काम करीत होते.
शारीरिक उपचराबरोबरच मानसिक उपचाराचाही गरज
अशा मृत्यूंचा क्रम पाहता जीवन खरोखरच एवढे स्वस्त झाले आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र अशा प्रकारे सुरू असून त्याची क्षुल्लक कारणे समोर येत आहेत. त्यामुळे शारीरिक उपचराबरोबरच आता मानसिक उपचाराचाही गरज निर्माण झाली आहे. असे कृत्य करताना माणसाची भावनिक विचार थांबतात आणि भविष्यातील परिणामाची चिंता न करता क्षणार्धात हे कृत्य केले जात असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.