लातूर - निलंगामधील यलमवाडीमध्ये दोन सख्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा विजय राजे (वय 9 ) व पूजा विजय राजे (वय 11) असे मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भरावासाठी प्रशासनाकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यात जनावरे चारण्यासाठी दोघे गेले होते. तेव्हा ही घटना घडली.
कृष्णा आणि पूजा हे जनावरे चारण्यासाठी निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर सकाळपासून गेले होते. निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भरावासाठी प्रशासनाकडून जवळपास तीन एकर क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. या कालव्याच्या भरावासाठी वाहण्यात आलेल्या मुरूम व दगडामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला होता. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरला असून शिवारातील विंधन विहिरीही भरून वाहिल्या आहेत. शासनाने पाडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे.
पाण्यात गेलेल्या जनावरांना हाकण्यासाठी कृष्णा पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. तेव्हा बुडत असलेल्या भावाला पाहताच पूजाने पाण्यात उडी घेत, भावाला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे.