लातूर - गेल्या 5 वर्षातील राज्यात आणि देशात झालेला विकास सर्वांसमोर आहे. गेल्या पंधरा वर्षात आघाडी काळात जो विकास झाला नाही, त्यापेक्षा अधिक कामे 5 वर्षात झाली आहेत. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले आणि त्यांनातरची 50 वर्ष काँग्रेसने. पण आता जनता हुशार झाली असून दिशाहीन झालेली काँग्रेस महाराष्ट्राचे काय हित जोपसणार असा सवाल उपस्थित करीत ज्याप्रमाणे मी देशाच्या प्रिन्सचा पराभव केला, तसा तुम्ही लातूरच्या प्रिन्सचा पराभव करा म्हणत त्यांनी आमदार अमित देशमुख यांना टोला लगावला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असताना खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कारभारावर सवाल उपस्थित केले. 50 वर्ष सत्ता असताना काँग्रेसने जनतेच्या मूलभूत गरजाही पूर्ण केल्या नाहीत. मात्र, भाजपने 5 वर्षात 11 करोड शौचालय बांधली आहेत. उज्वल गॅस योजनेमुळे अंधकार जीवनमान प्रकाशमय झाले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून राज्यस्थान, मध्यप्रदेश येथील जनतेची फसवणूक केली आहे.मात्र, ये महाराष्ट्र की जनता है. सब कुछ जाणती है, असे म्हणत काँग्रेसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विकासाची कामे कोण करू शकते हे सामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे पोकळ आश्वासनाना बळी न पडता विकासाला साथ देण्याचे आवाहन केले. देशात काँग्रेसची वाताहत सुरू आहे. त्यामुळे स्वतः दिशाहीन असलेले महाराष्ट्राला काय दिशा देणार असा सवाल उपस्थित केले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांजरा धरणातील लातूरकरांचे हक्काचे पाणी आमदार अमित देशमुख यांनी स्वतःच्या कारखान्यासाठी वापरले असल्याचा आरोप केला. त्यामुळे ही पाणीटंचाई निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. त्यामुळे लातूरच्या प्रिन्सला जागा दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले.
गेल्या 10 वर्षात उद्योग. उजणीचे पाणी यावरून आमदार अमित देशमुख यांनी लातूरकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन उमेदवार शैलेश लाहोटी यांनी केले.