लातूर - राजकीय क्षेत्रातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी अनेकजण नवस बोलतात. त्याची पूर्तता होईल का नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, लातूरातील एका सच्चा शिवसैनिकाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, याकरता नवस बोलला होता. आता आपल्या नवसपूर्तीसाठी ७५ किमीच्या दंडवतास सुरवातही केली आहे.
लातूर तालुक्यातील विष्णू बाबू शिंदे यांनी गेल्या दोन महिन्यातील राजकीय घडामोडीपूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याकरता तुळजाभवानीला नवस केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांनी पायी दंडवत घालण्याला सुरवात केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे बळ कमी असले तरी सच्चे शिवसैनिक असल्याचे हे उदाहरण आहे. त्यामुळेच विष्णू शिंदे यांनी खंडाळा ते तुळजापूर या ७५ किमी प्रवासाला सुरवात केली आहे. हा नवस पूर्ण करण्यासाठी शिंदे हे कुटुंबासमवेत मार्गस्थ झाले आहेत. त्यासोबत तालुक्यातील इतर शिवसैनिकही बरोबर आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे नवस केलेले समोर आले आणि शिवसैनिक ते पूर्णही करीत आहेत.