लातूर - नातेवाईकांमध्ये होत असलेले राजकारण हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मात्र, यामुळे अनेकांचे संबंध ताणले गेले आहेत. तर काही जण सत्ता हव्यासापोटी कायमचे नाते संबंध तोडतात, एकमेकांच्या जिवावर उठतात. पिड्यांपिड्या वैरी होतात. मात्र, काहींनी राजकारणानंतरही नाते संबंध जपले आहेत. त्यापैकीच संभाजी पाटील निलंगेकर हे एक आहेत. गेल्या दोन टर्मपासून ते चुलते अशोकराव पाटील यांच्याविरोधात लढत आहेत. शिवाय आजोबा शिवाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबतही त्यांचे मतभेद आहेत. मात्र, 4 दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला सारून त्यांनी आजोबांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रकृती विषयी गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृती विषयी उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. यानंतर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घरी जाऊन आपल्या आजोबांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला. ईश्वराकडे दीर्घ आयुष्य मिळावे, यासाठी प्रार्थना केली. या विषयी त्यांना विचारणा केली असता, गेल्या दहा दिवसापासून डॉ. निलंगेकर यांची प्रकृती ठीक नव्हती निवडणूक काळात जर मी भेटण्यासाठी गेलो असतो तर यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले असते. म्हणून मी ते टाळले. मात्र, फोनवर सतत त्यांच्या प्रकृती विषयी विचारपूस करत होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी अरविंद पाटील निलंगेकर हे त्यांना प्रत्यक्षात भेटून आले होते. जिल्ह्यात पितृतूल्य नेतृत्वाची गरज आहे. आपल्या वयापेक्षा त्यांना राजकीय क्षेत्राचा अनुभव जास्त आहे आणि अशा नेतृत्वाची भविष्यात तुम्हा आम्हा सर्वांना गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लातूर मधील भाजपचे मताधिक्य कमी झाले आहे. याबाबत विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मी सध्या आजोबांच्या प्रकृती विषयी पत्रकारपरिषद बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले सांगितले.