लातूर - देशासह राज्यातही थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपतींनी कोरोनासाठी सरकारला मदत म्हणून काही रक्कम दिली आहे. याचसाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. लातूर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य विभाग विविध उपाय करत आहे. या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे, या उद्देशाने माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात निलंगेकरांनी जिल्हाधिकार्यांना एक पत्र दिले आहे. या निधीतून उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी, असे या पत्रात म्हटले आहे. हा निधी कुठे आणि कसा खर्च केला जाईल, याची सविस्तर रूपरेषाही सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. जिल्हा पातळीवर कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी दिला गेलेला हा सर्वात मोठा निधी ठरणार आहे.
नागरिकांचे आरोग्य ही सध्या प्राथमिकता आहे. ज्या देशात चांगल्या आरोग्य सुविधा आहेत, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास थोड्या प्रमाणात मदत झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी हा निधी असून गरज भासल्यास आणखी निधी देऊ, असेही निलंगेकर यांनी सांगितले.