लातूर - लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ राहिला आहे. यंदा युतीची गणिते फिरली आणि हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे महायुतीमधील घटक पक्षातच नव्हे तर शिवसेनेमध्येही नाराजीचा सूर होता. मात्र, नाराजही एकाच घरातले असल्याने या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार सचिन देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख रुग्णालयात...
महायुतीची समीकरणे जुळविण्यासाठी भाजपने लातूर ग्रामीण हा मतदारसंघ ऐन वेळी शिवसेनेला सोडला होता. त्यामुळे उमेदवार कोण याबाबत सर्वच संभ्रमात होते. शिवाय भाजपाकडून इच्छुक असणारे रमेश कराड हे देखील बंडखोरीच्या तयारीत होते. मात्र, वरिष्ठांचे आदेश येताच त्यांनी आपले बंड मागे घेतले. परंतु अद्यापही त्यांची नाराजी कायम असून ते या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेरच आहेत. एवढेच नाहीतर तर राजकीय पार्श्वभूमी नसताना सचिन देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये देखील नाराजी होती. नाराज हे घरातलेच असून त्यांची मनधरणी करून प्रचारात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. युती काळात झालेला विकास हाच मुद्दा घेऊन लातूर ग्रामीणमध्ये ते प्रचार करीत असले तरी या मतदारसंघातील शिवसेनेची ताकद, महायुतीमधील इतर पक्षातील नाराजी आणि काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांचे तगडे आव्हान पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही.
हेही वाचा - काँग्रेसचे विसर्जन राहुल गांधीच करतील - योगी आदित्यनाथ
आगामी काळात योग गुरू रामदेव बाबा यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करणार असल्याचेही सांगितले. राजकीय पार्श्वभूमी नसली तरी विकासाच्या मुद्यावर निवडणुकीच्या आखाड्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.