लातुर - पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खरीप हंगामाच्या नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान गैरहजर राहिलेले आंबुलगा बु. (ता. निलंगा) येथील ग्रामविकास अधिकारी डी. पी. खंडाळे यांस काल (शनिवार) तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी, की जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पीक पाहणीचा दौरा निलंगा तालुक्यातील काही गावांमध्ये होता. प्रशासकीय पातळीवरून या दौऱ्याबाबत सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. शिवाय पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर यांसह प्रमुख अधिकारी दौऱ्यात उपस्थित होते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन, तुर आदी पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना आधार देण्यासाठी व त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दौरा आयोजित केला होता. तालुक्यातील काही गावाला त्यांनी भेटी दिल्या. अंबुलगा बु. येथे पालकमंत्री यांनी पीक पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी गावातील काही नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी डी. पी. खंडाळे यांच्या सततच्या अनुपस्थिती बाबत तक्रारी केल्या. अधिकृत दौरा असतानाही ते गैरहजर होते म्हणून या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. त्यामुळे संबंधित ग्रामविकास आधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे.
या पीक पाहणी दौऱ्यादरम्यान देवणी येथील पीक विमा अधिकारी यांना स्वतः पालकमंत्र्यांनी मी वलांडी येथील शेतकरी बोलतोय साहेब तुम्ही कुठे आहात, असे विचारताच उडवाउडवीचे उत्तरे संबंधित अधिकाऱ्याने दिल्यामुळे त्यांनाही निलंबित केल्याचे अधिकृत वृत्त आहे.