लातूर - लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेसकडून एकाही वरिष्ठ नेत्याची सभा लातुरात झाली नाही. प्रचार अंतिम टप्प्यात असताना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील रितेश देशमुख यांचा लातूर सभेतील व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.
देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती नाही तर एक हृदय असावे लागते. ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट असते, असे रितेश देशमुख त्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. काँग्रेसने ६० वर्षे काहीच केले नाही, असे म्हणणाऱ्यांना रितेश यांनी टोला लगावला आहे.
मोबाईलची क्रांती काँग्रेसच्या काळातच...कॉम्प्युटर... फेसबुक हे देखील काँग्रेसच्या काळातच आले आहे. एवढेच नाही देशाला स्वातंत्र्यही काँग्रेसनेच दिले आहे. ही भाषणातील वाक्य काढून पुन्हा ५ वर्षानंतर व्हायरल केली जात आहेत. प्रत्यक्षात प्रचारादरम्यान रितेश देशमुख हे लातूरला आलेच नाहीत. मतदानाचा हक्कही ते मुंबईतूनच निभावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.