लातूर - महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मिळून मार्ग काढला. संकट काळात एकमेकांना मदत करणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक फक्त शेजारीच नाहीत, तर एकाच आईची मुले आहेत. मोदी सरकारच्या काळात हे संबंध अधिक सलोख्याचे होत असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केले. लातूरमधील महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
सभेदरम्यान मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मोदी सरकारची स्तुती केली. मोदी केवळ लोकप्रियच नाहीत तर एक प्रभावशाली नेता आहेत. त्यांच्यामुळेच भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आघाडी सरकारच्या 50 वर्षात जे काम झाले नाही, ते मोदींच्या काळात मागील 5 वर्षात झाले आहे.
हेही वाचा - मतदारसंघ बदलणाऱ्यांना प्रणितींचा टोला, म्हणाल्या 'मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है'
आघाडी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था ढासळल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. भ्रष्टचाराने देश पोखरला जात होता. मात्र, गेल्या 5 वर्षात देश प्रगतीपथावर जात आहे. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरचा विकास होणार आहे. राज्य सरकारने हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्प कौतुकास्पद आहे. मराठवाड्यातून आत्तापर्यंत 3 मुख्यमंत्री झाले. मात्र, हा प्रांत विकासापासून वंचितच राहिला आहे. काँग्रेसची मानसिकताच विकासाची नव्हती म्हणून विकासाची गती मंदावली होती, असे येडीयुरप्पा म्हणाले.
हेही वाचा - रविकांत तुपकरांचा १९ दिवसानंतर 'स्वाभिमान' जागा.. बूंद से गयी वो हौदसे आयेगी?
यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी, खासदार सुधाकर शृंगारे, महापौर सुरेश पवार हे उपस्थित होते.