लातूर - भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात बंडखोरीला सुरवात झाली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आल्याने भाजपकडून इच्छुक असलेले रमेश कराड हे आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज रेणापूर नाका येथील कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या संकल्प मेळाव्यात कराड यांच्या समर्थकांनी 'लातूर ग्रामीण परत द्या' अशा घोषणादेखील दिल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनेची एकही शाखा नसताना लातूर ग्रामीण ही जागा त्यांना कशी देण्यात आली , असा सवाल कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. त्यामुळे आता ही जागा मागायची नाही, तर हिसकावून घ्यायची, असा पवित्रा घेत कराड अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
हेही वाचा - लातुरात भाजप घडवणार राजकीय भूकंप, काँग्रेसनिष्ठ चाकूरकरांच्या सुनबाईला देणार उमेदवारी?
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपकडून उमेदवारी मिळणार या हेतूने रमेश कराड तयारीला लागले होते. ऐन वेळी भाजपने तिकीट डावलून ही जागा सेनेला सोडली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे या संकल्प मेळाव्यात काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचेही चित्र होते. त्यामुळे जगा वाटपावरून मोठा तेढ निर्माण झाला आहे. पक्ष काहीही भूमिका घेऊन निवडणूक लढविणार हे नक्की असल्याचे रमेश कराड यांनी स्पष्ट केले.