लातूर - यंदा सणावरही कोरोनाचे संकट आहे. लातूर जिल्ह्यात नागपंचमीनंतर आता राखीपोर्णिमादेखील लॉकडाऊमध्येच साजरी करण्याची नामुष्की ओढावली आहे. मात्र, असे असतानाही जळकोट शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये असलेल्या भ्रमन्ना कुटुंबीयांनी वेळेचा सदुपयोग करत या काळात राख्या बनवल्या आहेत. यामुळे विधायक कामासह नकारात्मक वातावरणापासून विरंगुळा झाला.
जळकोट शहरातील कृष्ण नगरमध्ये 26 जुलै रोजी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आशा परस्थितीमध्ये इयत्ता 6 वी मध्ये असलेल्या सृष्टी भ्रमन्ना हिने भन्नाट आयडिया मांडली. या वेळेत टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवायच्या. यातच राखीपोर्णिमा काही दिवसांवर आल्याने तिच्या कुटुंबीयांनी राख्या बनविण्याचे काम हाती घेतले. सृष्टीची आई शिवणकाम करीत आहे. त्यामुळे शिवणकामात शिल्लक राहिलेले धागे तसेच टिकल्या मणी यापासून त्यांनी राख्या बनविल्या आहेत. तर उर्वरित शिल्लक कपड्यातून पायपुसनी अशा टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत. सोमवारी राखीपोर्णिमा आहे. कन्टेन्मेंट झोन असल्याने शेजारच्यांना बाहेर जाऊन राख्या खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे ह्याच राख्या वाटण्याचा सृष्टीचा मानस आहे. ही बाब लहान असली तरी कन्टेन्मेंट झोनमधील चिंताजनक वातावरणात सृष्टीने हाती घेतलेले काम महत्वाचे आहे.