लातूर - महिन्याभराच्या उघडीपनंतर लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळत असला तरी अद्यापही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या पुनरागमनामुळे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी लातूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपाच राहिली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली असून सर्व जलसाठे अद्यापही कोरडेठाक पडल्याने जलसंकट कायम आहे. जिल्ह्यात 108 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर, लातूर शहराला 12 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
यातच सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना दिलासा मिळाला. तरीही उर्वरित पेरणीसाठी आणि जलसाठ्यात पाणी साठण्यासाठी मोठ्या पावसाची गरज कायम आहे.
जिल्ह्यात पावसाची सरासरी 802 मिमी असताना आतापर्यंत केवळ 163 मिमी पाऊस झाला आहे. तर, एकूण सरासरीच्या तुलनेत 22 टक्के पाऊस झाला असताना सोमवारपासून वातावरणात झालेला बदल आणि पावसाने लावलेली हजेरी नक्कीच दिलासादायक आहे. त्यामुळे किमान आता तरी पावसात सातत्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून सोमवारी सुरू झालेला रिमझिम पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.