लातूर - लातूर पोलिसांनी अवैध दारू व मटका जुगारावर शुक्रवारी जिल्ह्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण 134 गुन्ह्यांत 147 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 8 लाख 58 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर जिल्ह्याच्या विविध भागात अवैध मद्यविक्री व मटका जुगार धुमधडाक्यात सुरू आहे. यास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी लातूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून अवैध मद्यविक्री व मटका जुगारावर जिल्ह्याच्या विविध भागात एकाच वेळी छापे मारण्यात आले. संपुर्ण जिल्ह्यात एकाच वेळी केलेल्या या धडक कारवाईत एकूण 134 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच 147 आरोपींसह 8 लाख 58 हजार 176 रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या कंडक्टरला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड
अवैध मद्यविक्री -
जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीचे एकूण 106 गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी 110 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 6 लाख 32 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबरोबरच जिल्ह्यात मटका जुगारावरही एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आले आहेत. यामध्ये एकूण 37 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 2 लाख 25 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.