लातूर - शिक्षण विभागातील मनमानी कारभाराला त्रासून सोमवारी अहमदपूर तालुक्यातील सिंदगी (बु) येथील ग्रामस्थांनी केंद्र प्रमुखासह गटशिक्षणाधिकारी यांना वर्गात कोंडून ठेवले. केंद्र प्रमुखाच्या सुटकेसाठी आलेले गटशिक्षण अधिकारीही ग्रामस्थांच्या रुद्र अवताराचे शिकार झाले.
त्याचे झाले असे, अहमदपूर तालुक्यातील सिंदगी (बु) येथे मागील दोन वर्षांपासून नियुक्त असलेले इंग्रजी विषयाचे सह-शिक्षक मारोती कदम हेच शाळेला दांड्या मारतात. ते सतत गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती. ग्रामस्थांनी अनेकवेळा ही बाब शिक्षण विभाग अहमदपूर यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, गावकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाकडून वेळोवेळी केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी ग्रामस्थांनी आक्रमक होऊन शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला कंटाळून केंद्रप्रमुख एम.एस. मिटकरी व मुख्याध्यापक के. एन. काचे यांना जि.प .शाळेत कोंडून ठेवले होते.
हेही वाचा - आठवड्याच्या पहिल्या दिवसाची शाळा 2 तासांची; जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांनीच केल्या शाळा बंद
गावातली ही बाब गट शिक्षण अधिकारी बबन ढोकाडे यांना समजताच त्यांनी शाळेवर येऊन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व बाबीला तुम्हीच जबाबदार असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी बबन ढोकाडे यांना देखील शाळेत कोंडून ठेवले. जोपर्यंत कायम स्वरूपी इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलुप उघडले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे यांनी इंग्रजी विषयाचे पदवीधर सह-शिक्षक प्रमोद यादव यांच्या नियुक्तीचे पत्र ग्रामस्थांना दिल्यामुळे तब्बल दोन तासांनी गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना सोडण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी तर निघून गेले. मात्र, त्यानंतर 2 तास वर्ग भरला तो मुख्यध्यापक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षण अधिकारी यांचा आणि शिक्षकांच्या भूमिकेत होते ते शिक्षक.
हेही वाचा - लातूर : उजनीचे पाणी तर दूरच, गतवेळच्या रेल्वेचे बिल अदा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष