लातूर - चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या एका अफवेवर पोल्ट्री फार्मसह चिकन विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तब्बल दीड महिन्यानंतर हा व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागला आहे. एक वेळ १० रूपये किलोने विकावे लागलेल्या चिकनचा दर गेल्या आठ दिवसांत 180 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यासह पोल्ट्री फार्म धारकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, मागणी वाढत असताना दुसरीकडे पुरवठा कमी असल्याची खंत मात्र कायम आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा चिकन विक्रेते आणि पोल्ट्री फार्मधारकांना बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. यामुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली होती. मध्यंतरी 8 ते 10 रुपये किलोप्रमाणे चिकन विक्री केली जात होती. अडचणीत असलेल्या पोल्ट्री फार्म धारकांनी अक्षरशः जिवंत कोंबड्या जमिनीत गाढल्याही होत्या. ग्राहकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन आणि संघटनेच्या वतीने एक ना अनेक प्रयत्न केले होते. लातुरात चिकन फेस्टिव्हलचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यानंतर परिस्थिती बदलत आहे. ग्राहकांमधील गैरसमज दूर होत असून चिकन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. असे असले तरी अनेकांनी उत्पादन बंदच केल्याने सध्या पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मटण, चिकन विक्रीला सूट देण्यात आली असून आता मटण बरोबरच चिकन घेण्यासाठीही ग्राहकांची गर्दी होत आहे.