लातूर- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार असून सध्याचा पाऊस खरीपासाठी पोषक ठरत आहे. तर उकड्यापासून नागरिकांना दिलासाही मिळत आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजप्रमाणे सोमवारीही पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळी लातूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. खरीप पेरणीच्या अनुषंगाने मशागतीचे कामे उरकली असून सध्याचा पाऊस पेरणीसाठी पोषक आहे.
सोमवारी दिवसभर उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी वाढत्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लातूर, निलंगा, औसा शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पत्रे उडून गेले आहेत. मशागत झालेली शेतजमीन अधिक सुपीक होऊन पेरणीयोग्य होणार आहे. त्यामुळे पावसाचे आगमन तर योग्य वेळी झाले आहे.
पावसामध्ये असेच सातत्य राहिले तर यंदा वेळेतच खरिपाच्या पेरण्याही होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.