लातूर - दारू दुकानासमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दारू विक्रीचा पर्याय खुला करण्यात आला आहे. मात्र, यामध्येही गरिबांवर अन्याय होत असल्याची भावना मद्यप्रमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्री थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे.
लातुरात ऑनलाईनद्वारे दारू विक्रीला सुरवात झाली आहे. रविवारी सबंध जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी दारूच्या दुकानासमोर गर्दी होती. दुकाने बंद असतानाही मागच्या दाराने होणाऱ्या विक्रीमुळे जागोजागी गर्दी पाहावयास मिळत आहे. शिवाय ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असतानाही ज्यांची चलती आहे, त्यांनाच दारू दिली जात असल्याचा आरोप मद्यप्रेमींनी केला आहे. दारू विक्रीबाबतही दुजाभाव केला जात असल्याने मद्याप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
रविवारी सकाळी 10 वाजतापासून शहरातील विविध वाईन शॉप समोर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, ज्यांची पोलिसांशी सलगी आहे, त्यांनाच दारू दिली जात असल्याचा आरोप मद्यप्रेमींनी केला आहे. शिवाय असा प्रकार होत असेल, तर ऑनलाईन विक्रीही थांबवावी अशी मागणी होऊ लागली आहे.