लातूर - सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास बंदी असतानाही लातूरमध्ये विवाह समारंभ पार पडत होता. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे. लग्न समारंभ पार पाडताच नवरा-नवरीसह त्यांचे आई, वडील, फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे शहरात कमालीचा शुकशुकाट पहावयास मिळाला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. त्यांनतर आज येथील विवेकानंद रुग्णालयासमोर शिंदे आणि मगर या कुटुंबातील सुरज व निकिता यांचा विवाह पार पडत होता. या ठिकाणी वऱ्हाडी आणि पाहूणे मिळून 200हून अधिक नागरिकांचा जमाव होता. याची माहिती शिवाजी नगर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. तोपर्यंत विवाह समारंभ पार पडला होता. मात्र, जमाव कायम होता. त्यानुसार जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी वधू-वर, आई, वडील आणि फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. तर दुसरीकडे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे करीत होते, तर शहरातून पोलीस कर्मचारी हे बाजारपेठेवर लक्ष ठेऊन होते. सलग दोन दिवस मार्केट बंद राहणार असल्याने भाजी मंडईत नागरिकांनी गर्दी केली होती.